घरात घुसून वृद्धाचा खून , चाकूचे सपासप वार करणारा निघाला अल्पवयीन मुलगा...!!

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) ः सिगारेटच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात एका अल्पवयीन मुलाने इसमावर चाकूने सपासप वार केले. या भयंकर हल्लयात सदर इसम जागीच ठार झाला. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ८) रात्री नऊ ते सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे पटरीपलीकडील राजनगरात घडली. याप्रकरणी अल्पवयीन आरोपीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

रोहिदास दत्तू खकाळ रा. राजनगर छत्रपतीनगर मुकुंदवाडी असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मयताची पत्नी राणी रोहिदास खकाळ (वय ५०) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार फिर्यादी पतीसह राजनगर येथे राहतात व दोघेही पती पत्नी मजूरी करतात. बुधवारी (दि.८) रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास १५ वर्ष ३ महिने वयाचा ओळखीचा अल्पवयीन आरोपी याने दार वाजविले. फिर्यादींचे पती घरात झोपलेले होते. फिर्यादींनी दार उघडताच अल्पवयीन आरोपी घरात आला.  जुन्या भांडणाच्या  व सिगारेट ओढण्याच्या कारणावरून आरोपीने अचानक पतीवर हल्ला चढवला. पोटात आणि पाठीत चाकूने वार केल्यामुळे पती रक्ताच्या थारोळ्यात पडले.
 
तब्बल आठ वार..
१५ वर्षीय अल्पवयीनाने अतिशय क्रुरपणे रोहिदास यांच्यावर हल्ला चढवला. धारदार चाकूने त्यांच्या पोटात तीन ते चार वार केले. प्रतिकार केल्यानंतर पुन्हा त्याने पाठीत चाकू खूपसला. पाठीतही तीन ते चार वार केले. या भयंकर हल्ल्याने रोहिदास जागीच कोसळले. गंभीर जखमी त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आरोपीला घेतले ताब्यात..
दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच मुकूंदवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवली. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनि गांगुर्डे हे करीत आहेत.